Edition

पलूस, कडेगाव, खानापूर परिसरातील शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा २० जून रोजी कुंडल येथे एल्गार मेळावा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कुंडल, प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी आणि बाधित शेतकऱ्यांच्या न्याय् हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कुंडल (ता. पलूस) येथील बलवडी-विटा रोडवरील मगदूम मल्टीपर्पज हॉलमध्ये(क्रांती साखर कारखाना नजीक) सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी दिली.

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे पलूस, कडेगाव, खानापूर, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील हजारो एकर सुपीक शेती बाधित होण्याची शक्यता असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष समिती रस्त्यावर आणि कायदेशीर पातळीवर लढा देत असल्याचे ॲड. लाड यांनी सांगितले.

यापूर्वी घोगाव (ता. पलूस) येथे झालेल्या शक्तिपीठ विरोधी एल्गार मेळाव्याला राज्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले होते. त्यानंतर संघर्ष समितीने नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रा, विटा येथील आक्रोश मेळावा तसेच भाग्यनगर परिसरातील ड्रोन सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन अशा विविध माध्यमांतून आंदोलनाची धार कायम ठेवली आहे.

२० जून रोजी होणाऱ्या मेळाव्यात शक्तिपीठ महामार्गाच्या संभाव्य परिणामांवर चर्चा, पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर लढ्याचे नियोजन आणि शेतकरी संघटनांमधील समन्वय यावर विचारमंथन होणार आहे. राज्यभरातील शेतकरी चळवळीतील नेते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

पलूस तालुक्यातील घोगाव, कुंडल, कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, शेळकबाव, वडिये रायबाग, आंबेगाव, नेवरी, भगतमळा, तसेच खानापूर तालुक्यातील नागेवाडी, भाग्यनगर, माहुली, वलखड, घानवड, चिखलहोळ, भेंडवडे, विटा आदी गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली आहे.

बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी केले आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!