
लोणंद शहरातील विविध भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, उलट्या, ताप तसेच इतर जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येणे, पाण्याचा रंग बदलणे तसेच दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. यामुळे अनेक नागरिकांना गॅस्ट्रो व इतर जलजन्य आजारांची लागण झाली असून अनेकांनी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. सध्या देखील अनेक नागरिक उपचार घेत असून त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार पडत आहे. तसेच नागरिकांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
नगरपंचायतीने तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करावी, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, जलकुंभ व पाणी टाक्यांचे निर्जंतुकीकरण करावे, प्रभावित भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी तसेच व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणंद तसेच आरोग्य विभागाला तातडीने परिस्थितीची माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने संयुक्त आरोग्य सर्वेक्षण, तपासणी शिबिरे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात. असे निवेदन लोणंद नगरपंचायत चे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक स्वाती होले यांना सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी दिले आहे यावेळी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी राजु कांबळे, मंगल बनकर, जयवंत बनकर आदी उपस्थित होते.











