वाई प्रतिनिधी : वाई येथील किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर श्री.अनिल लाखे यांना अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सासवड येथे त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण आमदार श्री.सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. लाखे यांनी अनेक वर्षांपासून समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गायन, अभंगगायनाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आजवर मराठी भाषा गौरवदिनानिमित्त अनेक कार्यक्रमामध्ये मराठी गीतांचे सादरीकरण केले. मराठी साहित्य संमेलनामध्ये गायलेल्या गीताबद्दल त्यांना स्व.डॉ.शंतनू अभ्यंकर यांचा हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, शिक्षणाचे महत्त्व तसेच सामाजिक एकोपा यांसारख्या विषयांवर ते सातत्याने जनजागृती करीत असतात.
त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पाली भाषेतून पदवी संपादन केली असून ते पुढे नोकरी करीत आपले पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांना संशोधनाची प्रचंड आवड आहे. रसायनशास्त्र विभागात ते प्रयोगशाळेत नाविन्यपूर्ण गोष्टींचा वेध घेत असतात.
कोल्हाटी-डोंबारी समाजासह विविध समाजघटकांतील वंचित, गरजू आणि दुर्बल व्यक्तींच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील युवकांना सकारात्मक दिशा मिळत असून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत आहे.
या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्री. लाखे यांच्या या सन्मानाबद्दल वाई परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.











