प्रतिनिधी : प्रविण केर्ले
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रख्यात कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी अण्णा हजारे यांच्या मौनावर आणि भाजपसोबतच्या कथित जवळीकीवर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
राळेगणसिद्धी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतावेळी अण्णा हजारे यांनी आरती केल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत सरोदे म्हणाले, “अण्णांनी स्वहस्ते देवेंद्र फडणवीस यांची आरती ओवाळली आहे, अजून काय पाहिजे?”
२०१४ नंतर अण्णा हजारेंच्या आंदोलनांची धार कमी झाल्याचा दावा करताना सरोदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. अण्णांचा प्रभाव कमी करण्यात महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, अण्णा हजारे यांच्या आसपासच्या काही व्यक्तींचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा दावाही सरोदे यांनी केला. अण्णांच्या एका निकटवर्तीयाच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहिल्याच्या प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केला.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात अण्णा हजारेंबाबत मांडलेल्या भूमिकेचा दाखला देत सरोदे यांनी त्यावर भाष्य केले. अण्णांच्या राजकीय भूमिकेतील बदल पाहता सोनिया गांधींचे मत चुकीचे नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.
एकेकाळी देशभर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे करणारे अण्णा हजारे सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर अपेक्षित भूमिका घेत नसल्याची टीका होत आहे. असीम सरोदे यांच्या या विधानांमुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या टीकेला अण्णा हजारे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









