Edition

केरूर येथील प्रगतशील शेतकरी श्री.चिदानंद कानडे यांचे एक एकरात १०५ टनांहून अधिक उसाचे विक्रमी उत्पादन!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

**चिक्कोडी,तालुका प्रतिनिधी अमर माने*

चिक्कोडी तालुक्यातील केरूर येथील प्रगतशील शेतकरी व कारखान्याचे सभासद श्री. चिदानंद मल्लप्पा कानडे यांनी आपल्या शेतात अवघ्या एक एकर क्षेत्रात १०५ टनांपेक्षा अधिक उसाचे उत्पादन घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेचा लाभ, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे.

या यशाची माहिती मिळताच कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर. बी. खांडगावे व प्रधान व्यवस्थापक (ऊस) एन. एस. हिरेमठ यांनी शेताला भेट देऊन ऊस पिकाची पाहणी केली. तसेच शेतकरी सभासद श्री. चिदानंद कानडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक आर. बी. खांडगावे म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करावा, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी आणि सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करून एकरी उत्पादनात वाढ साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रधान व्यवस्थापक (ऊस) एन. एस. हिरेमठ यांनी कारखान्यामार्फत ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी विविध सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाते. या सुविधांचा योग्य वापर करून श्री. कानडे यांनी एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

कारखान्याचे प्रभारी ऊस विकास अधिकारी सचिन मोपगार यांनीही शेताला भेट देऊन पाहणी केली. यावेळी किसान बाजारचे प्रभारी व्यवस्थापक (कृषी व्यवहार) आर. एस. इचलकरंजे यांनी माहिती देताना सांगितले की, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊस विकास योजनेचा लाभ घेत श्री. कानडे यांनी कारखान्याच्या किसान बाजारमधून उत्तम दर्जाची खते खरेदी करून त्यांचा योग्य वापर केला. त्यामुळे त्यांनी आपल्या एक एकर शेतात १०५ टनांहून अधिक उसाचे उत्पादन घेण्यात यश मिळविले.

कारखान्याच्या ऊस विकास योजनेचा लाभ घेऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी विक्रमी उत्पादन घेणारे श्री. चिदानंद मल्लप्पा कानडे यांचे यश परिसरातील इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी ऊस पर्यवेक्षक एन. आय. पाटील, सुभाष खोत, आर. ए. भीवसे, एम. एस. पाटील, शीतल कांबळे, महांतेश कुमटोळे तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!