सदलगा प्रतिनिधी -अनिलकुमार डेक्कन्नावर, सदलग्यातील द्रविड शेरी, बदनीकाई मळा, मल्लण्णावर कमत, खडकुळी हाळ भाग परिसरात ११ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्यांनी मोटार केबल चोरीचा धुमाकूळ घातला आहे. या चोरीत २५ ते ३० शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल्स चोरीला गेल्या असून, अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी शेतातील विहिरीवरील व नदीच्या काठावरचे मोटारींच्या केबल्स कापून नेल्या. सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. रब्बी हंगामाच्या तोंडावरच ही चोरी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करता येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
या भागात वारंवार केबल चोरीच्या घटना घडत असूनही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करावी, तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
या प्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.










