
सिंधुदुर्ग, दि. १३ (जिमाका) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात १४ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिन’ व ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह-२०२६’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्गमित केले आहेत.
या सप्ताहांतर्गत १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण तालुक्यातील वडाचा पाट आणि कणकवली येथील गणपती साना येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजता कणकवली येथील गणपती साना येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
१६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगड तालुक्यातील मोंड निकमवाडी, मालवण तालुक्यातील कुंभारमाठ आणि वेंगुर्ला कॅम्प येथे आधार कार्ड व शासकीय दाखले सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता या तिन्ही ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी प्रतिबंध तसेच महिलांविषयक विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वेंगुर्ला कॅम्प, कुडाळ तालुक्यातील तुपटवाडी आणि देवगड तालुक्यातील मौजे मुणगे येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता समारोप कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मृद व जलसंधारण विभागामार्फत जलजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्याकडून सहाय्यक प्रकल्प अधिकारी, विशाल घोरपडे, यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उपक्रमांचे यशस्वी आयोजन करावे. तसेच आयोजित कार्यक्रमांचे छायाचित्रांसह अहवाल १९ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.









