गांधीनगर प्रतिनिधी :
उदय साळुंखे
गांधीनगर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीत आवश्यक परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गांधीनगर येथील सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या स्थळपाहणीत बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले. संबंधितांना बांधकाम थांबविण्याबाबत नोटिसा बजावूनही बांधकाम सुरू ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी तक्रारी नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने संबंधित मिळकतींची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी नोटिसा बजावल्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक नगररचनाकार अंशुमन संजय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे : जितू सुंदरदास चावला, सतीश कन्हैयालाल आहुजा, पूनम महेश चावला, संगीता राम संतानी, मोहित नारायणदास जाट आणि लता महेश जाट — हे सर्वजण गांधीनगर येथील रहिवासी आहेत.
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्राधिकरणाकडून यापुढे अशा बांधकामांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











