प्रतिनिधी प्रविण केर्ले : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या निवडणुकीत ५,४१८ पैकी ५,४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या गटासमोर महायुतीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलचे आव्हान आहे. खासदार धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे गोकुळवरील वर्चस्वासाठी दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
१० तालुक्यांत १०० टक्के मतदान
निवडणुकीतील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या १० तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले. आजरा तालुक्यात ९९.६७ टक्के, तर गडहिंग्लज तालुक्यात ९९.७५ टक्के मतदान झाले. एकूण मतदारांमध्ये ४,०३८ पुरुष आणि १,३७८ महिला मतदारांचा समावेश होता.
मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष
मतदानाची टक्केवारी विक्रमी ठरल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. मतमोजणीनंतर गोकुळच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटांसाठी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.











