पुणे वृत्तसेवा : शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील अधिकृत पाठिंब्याचे पत्र महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. ऋषिकेश ताहकीक आणि राज्य संघटक डॉ. संदीप वाटेगावकर यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे सुपूर्द केले आहे अशी माहिती महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघ ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्य करणारी संघटना आहे. नेट-सेट व पीएच.डी.धारक शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, भरती प्रक्रिया, पदोन्नती, वेतनविषयक प्रश्न तसेच उच्चशिक्षण क्षेत्रातील विविध अडचणी शासनदरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याचे काम महासंघाच्या माध्यमातून केले जाते. शिक्षक हा स्वतः पदवीधर असल्याने पदवीधरांच्या प्रश्नांशीही शिक्षकांचे हितसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांच्या अनुषंगानेही महासंघ सकारात्मक भूमिका घेत असतो.
महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. ऋषिकेश ताहकीक म्हणाले, शिक्षकांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महासंघ सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, नेट-सेट व पीएच.डी.धारकांच्या मागण्या आणि उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक होणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधरांच्या अपेक्षा आणि प्रश्नांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे आहे. याच भूमिकेतून महासंघाने डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महासंघाचे राज्य संघटक डॉ. संदीप वाटेगावकर म्हणाले, डॉ. स्मिता जाधव या सुशिक्षित, अभ्यासू आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार आहेत. पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्याकडे आहे. आजच्या काळात पदवीधरांचे रोजगार, शिक्षण आणि भविष्यातील संधी यांसारखे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे नेतृत्व आवश्यक आहे. डॉ. स्मिता जाधव या पदवीधरांच्या अपेक्षांना न्याय देतील आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक भूमिका घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वातून पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळेल, या अपेक्षेने महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करत असताना पदवीधरांच्या प्रश्नांबाबतही सकारात्मक भूमिका घेणाऱ्या महासंघाने डॉ. स्मिता जाधव यांना जाहीर पाठिंबा दिल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.











