नणदी | विशालक्रांती वृत्तसेवा
चिकोडी तालुक्यातील नणदी, मलिकवाड, नागराळ व नणदीवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक व शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
मलिकवाड येथील स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. KA 23 HA 3858) काल रात्री चोरट्यांनी चोरून नणदी येथील शर्यतीच्या मैदानाजवळ आणली. त्यानंतर मोटरसायकलचे चाक काढून वाहन तेथेच सोडून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही शेत परिसरातून सीसीटीव्ही कॅमेरे, मोटरपंपच्या केबल, विहिरी व तळ्यांवर बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारी तसेच इतर साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत असून, रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्यासही नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे.
मद्यपींच्या अड्ड्यांमुळेही त्रास
नणदी ते नेज क्रॉसदरम्यान असलेल्या मद्यविक्री केंद्राच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत काही मद्यपी रस्त्याकडेला बसून मद्यप्राशन करून गोंधळ घालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे या मार्गावरून रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या मोटरसायकलस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासही काही नागरिक पुढे येत नसल्याची चर्चा परिसरात आहे. तक्रार केल्यास संबंधित गुन्हेगारांकडून गरीब नागरिकांना त्रास दिला जाईल, अशी भीती असल्याचे नागरिक सांगतात.
पोलिसांनी धाक निर्माण करावा
परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवावी आणि मद्यप्राशन करून रस्त्याकडेला गोंधळ घालणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गासह नागरिकांकडून होत आहे. पोलिसांचा ठोस धाक निर्माण झाल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











