
चंदगड प्रतिनिधी : संजय आगाशे, कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी निगडित असलेला आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हेरे सरंजाम प्रश्नाला अखेर कायमस्वरूपी पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमात या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद लाभार्थींनी व्यक्त केला. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शिवाजीराव पाटील (भाऊ) सहभागी झाले होते.
हेरे सरंजामचा प्रश्न हा केवळ जमिनीच्या कागदपत्रांपुरता मर्यादित नव्हता, तर हजारो कुटुंबांच्या जमिनीच्या मालकीहक्काचा, भविष्याचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न होता. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने संबंधित लाभार्थींना विविध शासकीय कामे, कर्जप्रकरणे तसेच जमिनीशी संबंधित व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत तो कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हेरे सरंजाम लाभधारकांनी महसूलमंत्री बावनकुळे यांचा विशेष सत्कार केला.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हक्काचा सातबारा हातात
या कार्यक्रमातील सर्वांत भावनिक आणि आनंदाचा क्षण म्हणजे हेरे सरंजाम लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या सातबाऱ्यांचे वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे ज्या कागदपत्राची प्रतीक्षा होती, तो हक्काचा सातबारा प्रत्यक्ष हातात मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
हक्काचा सातबारा मिळाल्याने संबंधित नागरिकांना आता आपल्या जमिनीच्या मालकीहक्काबाबत अधिक स्पष्टता मिळणार असून, विविध शासकीय प्रक्रिया, कर्जप्रकरणे आणि जमिनीशी संबंधित व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
हजारो कुटुंबांच्या संघर्षाला मिळाले यश
हेरे सरंजाम प्रश्नाच्या निर्णयामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आणि प्रशासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याची भावना लाभार्थींनी व्यक्त केली.
“वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली… हक्काची जमीन, हक्काचा सातबारा आणि हजारो कुटुंबांना मिळाला न्याय!” अशी भावना या ऐतिहासिक निर्णयानंतर नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या निर्णयासाठी राज्य सरकार तसेच महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे चंदगड विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी मा. आ. श्री. अशोकराव माने साहेब, मा. आ. श्री. राहुल आवाडे, मा. आ. श्री. अमल महाडिक, मा. श्री. नाथाजी पाटील, जिल्हाधिकारी मा. श्री. विजय राठोड साहेब, महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी, हेरे सरंजाम लाभधारक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या हक्कासाठी सुरू असलेला हा लढा आणि विकासाचा प्रवास यापुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











