
सांगली प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात कामेरी येथील युवक इंद्रजित पाटील यांनी अनोख्या पद्धतीने सरकारचे लक्ष वेधले. सांगली येथे झालेल्या मोर्चात त्यांनी रावणाचा मुकुट परिधान करून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविला.
शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विविध आंदोलने व मोर्चे काढण्यात आले. या प्रत्येक आंदोलनात इंद्रजित पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने सहभाग घेत लक्ष वेधून घेतले.
पंढरपूर येथील मोर्चात त्यांनी रेड्याचा मुकुट परिधान केला होता. कोल्हापूर व ईश्वरपूर येथील आंदोलनात त्यांनी पैलवानी शड्डू ठोकत सहभाग नोंदविला. तर सांगलीतील मोर्चात त्यांनी रावणाचा मुकुट परिधान केला.
या मुकुटावर ‘शेती व रोजगार गमवावा लागणार’, ‘महापुराचा धोका अधिक वाढणार’, ‘सुपीक जमिनीचा नाश होणार’, ‘पुढील पिढी शेतीपासून दूर जाणार’ आणि ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करा’ असे संदेश लिहिण्यात आले होते.
अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून शक्तिपीठ महामार्गामुळे शेती, रोजगार, सुपीक जमीन आणि पूरस्थितीवर होणारे संभाव्य परिणाम लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची मोर्चातील आंदोलकांसह समाजमाध्यमांवरही चर्चा झाली असून, त्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले जात आहे.











