Edition

प्रशासन सुस्त; लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूलसमोर भंगार-कचऱ्याचा ढीग, अतिक्रमणावरून संताप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी : शहरातील लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर भंगार व कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शाळेसमोरील भंगाराचा ढीग रस्त्यावर पसरत असल्याने विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरणही अस्वच्छ झाले असून शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी एमईसीबी परिसरातील अतिक्रमण आणि कथितपणे नोटरी करून गाळा विक्रीचा मुद्दा चर्चेत असतानाच आता हातगाडी उभी करून नव्याने अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाची अतिक्रमणाविरोधातील मोहीम थंडावल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर एवढ्या प्रमाणात कचरा आणि भंगार साचूनही संबंधित शिक्षण समिती, शाळा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित भंगारधारकाविरोधात तक्रार करून कारवाईची मागणी का करण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या अतिक्रमणांवर नेमकी कोणती कारवाई झाली, नव्याने होत असलेल्या अतिक्रमणांना कोणाचा वरदहस्त आहे आणि प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रभागाचे नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांची भूमिका काय राहणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थिनींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कचरा हटवून अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर ठोस कारवाई न झाल्यास गावातील सामाजिक संघटना आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!