Edition

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीवरील स्थगितीचा आरपीआय (आठवले)चा तीव्र निषेध; निर्णय मागे घेण्याची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली, दि. २ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली यांच्या नोकरभरती प्रक्रियेला दिलेल्या स्थगितीच्या आदेशाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी तीव्र निषेध केला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेऊन भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सचिन जाधव यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबर २०२६ पर्यंत असताना नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय अन्यायकारक, विसंगत आणि बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे.
राज्यात लाखो सुशिक्षित युवक-युवती रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भरती प्रक्रिया थांबवून शासन बेरोजगारी कमी करण्याऐवजी वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून बेरोजगारांच्या आशांवर पाणी फेरणारा आणि त्यांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबर २०२६ पर्यंत असताना त्याच कार्यकाळात भरती प्रक्रिया राबविण्यास नेमकी कोणती अडचण आहे, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे. भरती स्थगित करण्यामागील कारणे संशयास्पद असून त्यामुळे हजारो पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे,” असे जाधव यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ने शासनाला इशारा देत सांगितले आहे की, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी. अन्यथा बेरोजगार युवकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील.
बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा न पाहता शासनाने स्थगितीचा आदेश त्वरित मागे घेऊन गुणवंत उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी सचिन जाधव यांनी केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!