सांगली वृत्तसेवा – सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदोली परिसरातील शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथे एक अत्यंत थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या यशवंत मारुती यादव (वय ७५) या वृद्ध शेतकऱ्यावर गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात आणि शेतकरी वर्गात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटना स्थळावरून व परिसरातील शेतकऱ्याच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास यशवंत यादव हे नेहमीप्रमाणे आपल्या मालकीच्या ‘शिराळे-मळा’ येथील शेतात गुरांना वैरण (चारा) काढण्यासाठी गेले होते. ते उसाच्या पिकात वैरण काढत असताना, अचानक एक बेफाम आणि सैरावैरा पळत आलेला गवा रेडा त्यांच्या समोर आला. काही समजण्याच्या आतच गव्याने यादव यांना आपल्या शिंगावर उचलून जोरदारपणे जमिनीवर आपटले आणि तुडवले.
याच वेळी शेजारच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी यादव यांचा ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी आरडाओरडा करत घटनास्थळाकडे धाव घेतली. शेतकऱ्यांचा वाढता गोंगाट पाहून गवा रेड्याने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यादव यांना स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने तातडीने उचलून प्राथमिक आरोग्य केंद्र, शित्तूर-वारुण येथे आणण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ ‘कृष्णा हॉस्पिटल, कराड’ येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, कराडकडे जात असताना शेडगेवाडी परिसराजवळ पोहोचताच यादव यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चांदोली आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर कमालीचा वाढला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.










