डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या वतीने युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक ५ व ६ जून २०२६ रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य छगन शेरे यांनी दिली.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आणि दुर्गराज रायगडाचे ऐतिहासिक महत्त्व प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचत असल्याने दुर्गराज रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांच्या संख्येत दरवर्षी मोठी वाढ होत असुन या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर्षीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समितीच्या विविध ४० उपसमित्या कार्यरत असून संपूर्ण नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. स्वयंसेवक, वाहतूक व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता, निवास व्यवस्था, नियोजन मंडळ आदी बाबींची तयारी झाली असुन शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची मोठी संख्या लक्षात घेता, गडाच्या पायथ्याशी दोन आणि गडावर दोन ठिकाणी अन्नछत्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. रायगडावर होणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने एक विराट लोकोत्सव असून, हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन छगन शेरे यांनी केले आहे.










