प्रविण केर्ले : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पाच जागांपैकी महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागांवर विजय मिळवला, तर महायुतीने शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागा जिंकल्या. मात्र, भाजपला पदवीधर मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या पराभवावरून हा वाद अधिक चिघळला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपेक्षित साथ न दिल्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून, शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या वादात आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नवनाथ बन यांच्यावर जोरदार टीका केली. “नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती,” अशा शब्दांत राणे यांनी आपला संताप व्यक्त केला.










