तारदाळ : प्रविण केर्ले
दोन चिमुकल्या मुली अचानक दिसेनाशा झाल्या आणि संपूर्ण गावाची पावले त्यांच्या शोधासाठी धावू लागली. कुणी गल्लीबोळ पालथे घातले, कुणी घराघरांत चौकशी केली, तर कुणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास मदत केली. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, मुली कुठे असतील? अखेर तब्बल साडेचार तासांच्या शोधानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन्ही मुली सुखरूप आढळल्या आणि चिंतेने व्याकूळ झालेल्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
तारदाळ येथील वाडीव भागात घडलेल्या या घटनेने गुरुवारी परिसरात मोठी खळबळ उडाली. येथील एका शैक्षणिक संस्थेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सात ते आठ वर्षांच्या दोन मुली शाळेच्या बसमधून घराजवळ उतरल्या होत्या. मात्र, घरी पोहोचल्यानंतर त्या दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली.
सुरुवातीला परिसरात आणि नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, मुलींचा शोध लागत नसल्याने चिंता वाढली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या शोधमोहिमेत तरुण, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि शिक्षक सहभागी झाले. शहापूर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्याला सुरुवात केली.
परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासणे, घराघरांत चौकशी करणे, संभाव्य ठिकाणी शोध घेणे अशा विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू झाले. मुलींचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी आपापली कामे बाजूला ठेवली. शहापूर पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने फिरवत इतर पोलीस यंत्रणांशी समन्वय साधला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला.
दरम्यान, प्रत्यक्षात घडलेला प्रकार मात्र वेगळाच होता. घर बंद असल्याने दोन्ही मुली शेजारील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत खेळण्यासाठी गेल्या होत्या. खेळता खेळता त्यांना झोप लागली. घरातील व्यक्तींनाही त्या तिथे असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे शोधमोहीम सुरू असतानाही त्या परिसरातच असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.
अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलींना जाग आली. त्यांनी खिडकीतून मोठ्याने आवाज दिला. हा आवाज ऐकताच नागरिक आणि शिक्षकांनी त्या दिशेने धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावरील खोलीत दोन्ही मुली सुखरूप असल्याचे दिसताच सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान उमटले.
काही तासांपासून मनात साठलेली भीती आनंदाश्रूंमधून बाहेर पडली. पालकांनी मुलींना जवळ घेताच उपस्थितांनीही सुटकेचा श्वास घेतला. या शोधमोहिमेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता, शिक्षकांनी घेतलेली काळजी आणि ग्रामस्थांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी विशेष कौतुकास्पद ठरली.
संकट कोणाच्या घरात आले, यापेक्षा संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाणे महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय तारदाळकरांनी या घटनेतून दिला. दोन चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण गाव एकवटले आणि माणुसकीचा एक सुंदर अध्याय पुन्हा एकदा अधोरेखित झाला.









