
कुंडल : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी बलवडी फाटा (कुंडल) येथे शुक्रवारी दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता ऊस वाहतूक रोखण्यात येणार आहे. ऊसाचा दर निश्चित केल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही, असा ठाम इशारा रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती पलूस कडेगाव खानापूर चे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी दिला.या आंदोलनाला परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
साखर कारखानदारांनी प्रतिटन ५,५०० रुपये दर जाहीर करून तातडीने तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
ऊसाला सोन्याच्या कांडीचा भाव मिळण्याची क्षमता असतानाही साखर कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांच्या पदरात कवडीमोल भाव टाकत असल्याचा आरोप अॅड. लाड यांनी केला. वाढता उत्पादन खर्च, शेतीसाठी लागणारा पैसा आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. ऊस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिटन ५,५०० रुपये पहिली उचल मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
*कारखाने बंद ठेवा, शेतकऱ्यांनीही संयम राखावा!*
ऊस कारखानदारांनी प्रतिटन ५,५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत. यापूर्वी सुरू केलेले कारखाने तातडीने बंद करावेत, अशी मागणी अॅड. दीपक लाड यांनी केली. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या शेतात तोड घालू देऊ नये आणि आंदोलनाच्या काळात थोडा संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी रक्ताचे पाणी करत आहेत. या लढ्याला बळ देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह मोठ्या शेतकऱ्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अॅड. लाड यांनी केले.
*शुक्रवारी बलवडी फाटा येथे आंदोलनाची धडक*
ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही अॅड. दीपक लाड यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरासाठी हा लढा उभारण्यात येत आहे.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती (पलूस-कडेगाव-खानापूर) आणि रणसंग्राम सोशल फाउंडेशन सहभागी होणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळावा आणि प्रतिटन ५,५०० रुपये पहिली उचल निश्चित व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










