वाई. – प्रतिनिधी ०९ ऑक्टोबर २०२६
मराठी भाषेला प्राचीन परंपरा असून, संत, पंडित व शाहिरी वाड्.मयाने मराठी भाषा समृद्ध केली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी व ग्रंथालय विभाग यांनी अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोदी वीर, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, प्रा. डॉ. संग्राम थोरात व सहाय्यक ग्रंथपाल श्री. धनाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, वाई शहराला सांस्कृतिकदृष्ट्या महान परंपरा आहे. विश्वकोश निर्मिती कार्यालय हे मराठी भाषेची सेवा करण्याचे काम करीत आहे. मराठी भाषेमध्ये इतर भाषांमधील अनेक शब्द आले असून, ते मराठीमध्ये चपखलपणे बसले आहेत. मराठी भाषेला अडीच हजारांहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. प्राचीन मराठीमध्ये अनेक ग्रंथ निर्माण झाले आहेत. अनेक बोलीभाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती होत असून, मराठी भाषेची उंची वाढवण्याचे काम त्या-त्या प्रांतातील बोलीभाषा करीत आहेत. चांगले लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे म्हणाले, तीन ते नऊ ऑक्टोबर हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी संशोधन, संवर्धन, प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. दैनंदिन वापरामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. जोपर्यंत ग्रामीण जीवन आहे तोपर्यंत मराठी भाषा ही समृद्ध व संपन्न राहणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा. डॉ. संग्राम थोरात यांनी केले. तर आभार श्री. धनाजी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे, श्रीमती धनश्री भोसले, डॉ. संदीप वाटेगावकर, श्री. जितेंद्र चव्हाण, श्री. विशाल महांगडे, ग्रंथालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










