मिरवणुकीचा अनावश्यक खर्च टाळून चिमुकल्याच्या उपचारासाठी मदतीचा हात;.
गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श
गणेशोत्सव म्हटले की आकर्षक देखावे, रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुका डोळ्यासमोर येतात. मात्र, पलूस येथील यशवंत गणेशोत्सव मंडळाने यंदा उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत ‘देखावा’ नव्हे, तर माणुसकीचा अनोखा देखावा साकारला आहे. पलूस येथील चिमुकला श्री. अथर्व सागर चव्हाण याच्या उपचारासाठी मंडळाने तब्बल एक लाख रुपयांची मदत देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
अथर्व सागर चव्हाण या चिमुकल्याच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे यशवंत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर मंडळाने गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणुकीवरील खर्च कमी करून त्यातील रक्कम अथर्वच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. केवळ निर्णय घेऊन न थांबता मंडळाने दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत एक लाख रुपयांची मदत अथर्वच्या उपचारासाठी दिली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा पुढे नेत मंडळाने केलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात होणारा खर्च काही प्रमाणात कमी करून गरजू व्यक्तीच्या उपचारासाठी मदतीचा हात देणे, ही समाजासाठी प्रेरणादायी बाब ठरली आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना संकटात असलेल्या माणसाच्या मदतीला धावून जाणे, हीच खरी बाप्पाची सेवा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गणेशोत्सव हा केवळ डीजे, मिरवणूक, रोषणाई किंवा आकर्षक देखाव्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक संवेदना आणि माणुसकी जपणारा उत्सव व्हावा, अशी भूमिका मंडळाने कृतीतून मांडली.
आजच्या काळात उत्सवाच्या विविध उपक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असताना, त्या खर्चाला सामाजिक कार्याची दिशा देत एका चिमुकल्याच्या उपचारासाठी मदत करणे हा उपक्रम निश्चितच उल्लेखनीय ठरला आहे. ‘उत्सवातून आनंद आणि माणुसकीतून समाधान’ या भावनेतून यशवंत गणेशोत्सव मंडळाने केलेल्या या मदतीमुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक स्वरूपाची प्रचिती आली.
अथर्वच्या उपचारासाठी देण्यात आलेली ही मदत त्याच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार असून, अशा सामाजिक उपक्रमांमधून इतर गणेशोत्सव मंडळांनाही गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











