चंदगड प्रतिनिधी – चंदगड येथील शासकीय जमिनीचे कथितरीत्या दस्तऐवज तयार करून विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तातोबा गावडा याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तपास पुढे जात असताना या प्रकरणात तुर्केवाडी येथील ‘युवा संवाद’चे पत्रकार महेश बसापुरे आणि गडहिंग्लज येथील राजेंद्र माळी यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
राजेंद्र माळी यांनी यापूर्वी चंदगड तहसील कार्यालयात काम केले असून सध्या ते कोल्हापूर येथे कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. संबंधित कागदपत्रे व व्यवहारांच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका होती का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, महेश बसापुरे यांच्यावर पत्रकारितेच्या ओळखीचा कथित गैरवापर करून आर्थिक व्यवहार केल्याचे आरोपही चर्चेत आले आहेत. पोलिसांनी त्यांचा लॅपटॉप जप्त केला असून त्यातील माहिती तपासात महत्त्वाची ठरू शकते.
शासकीय जमिनीचे दस्तऐवज कसे तयार झाले, संबंधित कागदपत्रे कोणी हाताळली आणि या प्रकरणात महसूल विभागातील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, संबंधित व्यक्तींवरील आरोप व त्यांची नेमकी भूमिका ही पोलिस तपासाच्या अधीन असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.











