
सांगली प्रतिनिधी – चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराच्या प्रश्नावरून वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची धार तीव्र केली आहे. शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल प्रति टन ५ हजार रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येडेनिपाणी फाटा येथे एन. डी. पाटील शुगरकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली.
ऊसदर जाहीर केल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना योग्य पहिली उचल मिळाल्याशिवाय कारखान्यांकडे ऊस वाहतूक सुरू ठेवण्यास विरोध असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवून आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर उसाला योग्य दर मिळणे गरजेचे आहे. खत, औषधे, मजुरी, मशागत तसेच वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून, त्याचा विचार करून कारखानदारांनी शेतकऱ्यांना समाधानकारक पहिली उचल द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
“उसाला पहिली उचल ५ हजार रुपये मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
चौकट*.“शेतकऱ्यांनो, जरा दम धरा. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी आहे. तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. साखरेची विक्री पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे होत असताना सामान्य जनतेला साखर ६० ते ६५ रुपये किलोने मिळत आहे. तरीही साखर कारखानदार ऊस दराबाबत बोलत नाहीत. कारखानदार मात्र खुशाल ऊस वाहतूक करत आहेत. ऊसाची पहिली उचल निश्चित होईपर्यंत उसाची कांडी देणार नाही,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला.











