सांगली प्रतिनिधी – शासकीय आदेशानुसार १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे निर्देश असतानाही उसाची रिकव्हरी झालेली नसताना आणि दर जाहीर न करता ऊसतोड सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता येडेनिपाणी फाटा येथे संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एन. डी. पाटील शुगरची ऊस वाहतूक रोखली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ दिवसांपूर्वी कारखाना प्रशासनाला पत्र देऊन ऊसतोड सुरू करण्यापूर्वी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून दर निश्चित करण्याची मागणी केली होती. मात्र, चर्चा न करता आणि दर निश्चित न करताच ऊसतोड सुरू केल्याचा आरोप संघटनेने केला.
कारखान्यांनी पहिला हप्ता प्रतिटन ५ हजार रुपये जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत जो दर निश्चित केला जाईल, तोच दर कारखान्यांना द्यावा लागेल, असा इशारा संदीप राजोबा यांनी दिला.
आंदोलनाची माहिती मिळताच कुरळप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील माने यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान, सुमारे चार तासांनंतर कारखाना प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
कारखान्याचे शेती अधिकारी साळुंखे यांनी तुटलेला आणि शिल्लक ऊस दोन दिवसांत संपवून त्यानंतर कारखाना बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक सोडली.
दर जाहीर न करता ऊसतोड सुरू केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.











