_बेशिस्त पार्किंग, अवजड वाहनांची वर्दळ आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर; मनसेचे प्रशासनाला निवेदन_
संजय आगाशे | चंदगड प्रतिनिधी
चंदगड : चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा–हैरे मार्गावर अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक, व्यापारी तसेच औद्योगिक व अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
हलकर्णी फाटा परिसर हे तालुक्यातील महत्त्वाचे वर्दळीचे केंद्र असून या मार्गावर शाळा, महाविद्यालये तसेच साखर कारखाना असल्याने सकाळ व संध्याकाळच्या वेळेत वाहनांची मोठी गर्दी असते. त्यातच रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग, वाढलेली अतिक्रमणे आणि साखर कारखान्याकडे ये-जा करणारी अवजड वाहने यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे चंदगड तालुकाध्यक्ष राज बंडू संभेराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या हद्दीत झालेली अतिक्रमणे नियमाप्रमाणे हटवावीत तसेच अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण वाढणार
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हलकर्णी फाटा–हैरे मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ कोंडी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आगाऊ वाहतूक नियोजन, अतिक्रमण हटविणे आणि पार्किंग व्यवस्था निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अपघातानंतर कारवाई नको, आधीच उपाययोजना करा
“अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने आताच ठोस पावले उचलावीत,” अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली आहे. रस्त्याच्या हद्दीची पाहणी करून अतिक्रमणांची मोजणी करावी, अनधिकृत बांधकामे व पार्किंगवर कारवाई करावी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती निवेदनकर्त्यांना द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, चंदगड; पोलीस निरीक्षक, चंदगड तसेच संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. हलकर्णी फाटा–हैरे मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांचा प्रश्न लक्षात घेता प्रशासन यावर कितपत गांभीर्याने कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.











