
विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.
चिकोडी येथील केएलई सोसायटीच्या सी. बी. कोरे पॉलिटेक्निकमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ‘सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी भाषेचे ज्ञान, तार्किक क्षमता, मुलाखत कौशल्य आणि रोजगारासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने जीटीटी फाउंडेशन पुणे, महाविद्यालयाचा प्रशिक्षण व रोजगार नियोजन विभाग, आयक्यूएसी आणि एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख वक्ते म्हणून जीटीटी फाउंडेशन, पुणेचे प्रशिक्षण व रोजगार नियोजन समन्वयक आणि उत्तर कर्नाटक विभागाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि त्यांच्या व्यावसायिक वाटचालीत या कौशल्यांची असलेली गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पुढील तीन दिवसांत जीटीटी फाउंडेशनचे कार्यात्मक इंग्रजी आणि सॉफ्ट स्किल्स समन्वयक गणेश के., तसेच माहिती तंत्रज्ञान आणि क्षमता चाचणी समन्वयकज मंजुनाथ अंगडी हे विविध सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. ए. खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या अत्यंत स्पर्धात्मक रोजगार क्षेत्रात केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही, तर त्यासोबतच उत्तम संवाद कौशल्य आणि व्यावसायिक गुण अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी या चार दिवसीय प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा.” या कार्यक्रमाला आयक्यूएसी समन्वयक प्रा. बी. के. पाटील, प्रशिक्षण व रोजगार नियोजन समन्वयक प्रा. आर. आर. जिरळी, एनएसएस समन्वयक प्रा. एच. बी. गोंधळी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनी शांभवी हिने स्वागतगीत सादर केले. प्रा. वर्षा सदलगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. रमेश जिरळी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.











