
गांधीनगर(प्रतिनिधी):
उदय साळुंखे
करवीर तालुक्यातील सुमारे ५० ते ६० हजार लोकसंख्या असलेल्या व तब्बल १५ ते १६ हजार वीज ग्राहक असणाऱ्या उचगाव येथे अद्यापही स्वतंत्र ‘वीज बिल भरणा केंद्र’ नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हे केंद्र त्वरित सुरू करावे, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोहित जमेत कुलकर्णी व सहाय्यक अभियंता संदिप शिवाजी काकडे यांना हे निवेदन सादर केले.
गडमुडशिंगीला जावे लागत असल्याने वृद्धांची अन् नागरिकांची हेळसांड
निवेदनात नमूद केल्यानुसार, उचगाव, सरनोबतवाडी व परिसरातील वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी गडमुडशिंगी येथे जावे लागते. मात्र तेथेही बिल भरून घेण्याच्या मर्यादा आहेत. ज्यांची मुले कामाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत, अशा घरातील वयोवृद्ध नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी गडमुडशिंगी येथे जाणे अत्यंत त्रासाचे ठरत आहे.
तसेच सर्वच वीज ग्राहक ‘फोन पे’, ‘गुगल पे’ यांसारख्या ऑनलाइन सेवा वापरण्यास सक्षम नाहीत. उचगाव, सरनोबतवाडी ते गडमुडशिंगी हे अंतर जास्त असल्याने वेळेत बिल न भरल्यास वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडले जाते. यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
आंदोलनाचा इशारा
उचगाव येथील वाढती लोकसंख्या व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन महावितरणने आपल्या उचगाव कार्यालयामार्फत त्वरित ‘वीज बिल भरणा केंद्र’ सुरू करून नागरिकांची सोय करावी. अन्यथा करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट डांगट, शिवाजी लोहार, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराके, बाळासाहेब नलवडे, संतोष चेचर, कैलास जाधव, ओंकार फराके, योगेश लोहार, वसंत पवार, सागर पाटील, विनोद रोहिडा, सचिन गुरव, कृष्णात बुडके, सागर यादव, सुनिल पारपाणी, दीपक पोपटाणी (प्रेमवला) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











