Edition

खेळात हार-जीत नव्हे, तर सहभाग महत्त्वाचा— प्राचार्य डॉ.संजय अंकली यांचे प्रतिपादन.एजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

नेज, ता. चिकोडी : क्रीडा स्पर्धांमध्ये विजय किंवा पराभवापेक्षा खेळाडूंचा सहभाग अधिक महत्त्वाचा असतो.

खेळामध्ये सातत्यपूर्ण सरावाला अनन्यसाधारण महत्त्व असून, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते, असे प्रतिपादन एजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अंकली यांनी केले.

नेज-शमनेवाडी येथील एजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अंकली बोलत होते.

प्राचार्य डॉ. अंकली म्हणाले, मेजर ध्यानचंद यांनी रात्री चंद्राच्या प्रकाशातही हॉकीचा सराव केला. त्यांच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यामुळे त्यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उंचावले. भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा हॉकीचे सुवर्णपदक मिळवले असून, या ऐतिहासिक यशात मेजर ध्यानचंद यांचे योगदान अतुलनीय आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्तीचा प्रसंग सांगताना डॉ. अंकली म्हणाले की, ध्यानचंद हे केवळ महान खेळाडू नव्हते, तर ते सच्चे देशभक्तही होते.
खेळाच्या माध्यमातून देशाचा गौरव वाढवणे हीच त्यांची भूमिका होती. त्यांच्या जीवनातून आजच्या तरुणांनी शिस्त, मेहनत, सातत्य आणि देशप्रेमाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आज केंद्र सरकारकडूनही ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच नियमितपणे क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला डॉ. शशिकांत वाळके, के. आर. पाटील, प्रशांत शेडबाळकर, अभिजित अकिवाटे, अश्विनी फराळद, स्नेहा वाळकी, वैष्णव शेगळे, अश्विनी मोनाचार्य, राणी सुतुरे, मुत्तण्णा गोळप्पगोळ, पिरगौडा हुळीकोप्पे, कैफ मुल्ला, श्वेता हवालदार, कावेरी कडेमणी, स्वयं शाम, काडेश कलादगी, ज्ञानेश्वर नाईक, सुप्रिया गोळप्पगोळ, माधुरी बोरगांवे, अरुणा माळगे, प्रतिभा खोत यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत शारीरिक शिक्षण संचालक रवी वाळके यांनी केले. तर डॉ. सचिन मेक्कळकी यांनी आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!