गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे,
गांधीनगर ता. करवीर येथे सिंध समाजाच्या
श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक असलेल्या चालीहा साहिब पर्वाची गांधीनगर, कोल्हापूर येथील बाबा टोपणदास झूलेलाल मंदिरात भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सांगता सोहळ्यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी भगवान झूलेलाल यांचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चना करत सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
चालीहा साहिब पर्वाच्या सांगतेनिमित्त बहराणा साहिबची शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने काढण्यात आली. शोभायात्रेत सिंथ समाजातील महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी
मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आलेल्या बहराणा साहिबच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
शोभायात्रेदरम्यान भाविकांकडून जय झूलेलालफच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भक्तिगीतांच्या सुरांनी
आणि जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी श्रद्धेने सहभागी होत भगवान झूलेलाल यांचा आशीर्वाद घेतला.
चालीहा साहिब पर्वाच्या सांगतेच्या या पवित्र प्रसंगी भाविकांनी
आपल्या कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी तसेच समाजात शांतता, एकोपा आणि समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली. बाबा झूलेलाल यांच्या कृपेने प्रत्येक घरात आनंद आणि समाधान नांदावे, अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.
संपूर्ण आयोजनादरम्यान मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण होते. विविध भक्तिगीते, जयघोष आणि पूजाविधींमुळे भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. चालीहा साहिब पर्वाच्या सांगतेनिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे सिंघ समाजातील धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडले. भाविकांनी श्रद्धेने सहभागी होत हा पवित्र सोहळा उत्साहात पूर्ण केला.











