
कोल्हापूर : नॅनो टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर्स क्षेत्रात उल्लेखनीय संशोधनात्मक योगदान देणारे, तसेच मानद डॉक्टर, बेस्ट टीचर, ग्लोबल गुरू व राष्ट्रीय राजर्षी शाहू सन्मानप्राप्त कोल्हापूरचे सुपुत्र श्री. अनिल पोवार यांना ‘श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला युनिव्हर्सिटी’तर्फे रसायनशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
श्री. पोवार हे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथील ह्युमॅनिटीज अँड सायन्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा विभागप्रमुख आहेत. त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय “Synthesis of Transition Metal Oxide GO-rGO Composites: An Electrochemical Sensing Materials for Neurotransmitters and Organic Pollutants” असा आहे. या संशोधनातून न्यूरोट्रांसमीटर तसेच सेंद्रिय प्रदूषकांच्या शोधासाठी इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग मटेरियलच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले आहे.
त्यांचे तीन संशोधन निबंध ‘स्प्रिंगर नेचर’च्या नोंदणीकृत DOI सह पूर्णपणे इंडेक्स झाले असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ८ अॅक्टिव्ह सायटेशन्स प्राप्त झाले आहेत. उच्च Scopus CiteScore तसेच Q1/Q2 श्रेणीतील जर्नल्समध्ये त्यांच्या संशोधनाला प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित झाले आहे.
या शैक्षणिक यशाबद्दल श्री. अनिल पोवार यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगलीचे प्रशासकीय परिषद सदस्य मा. श्री. अमोल चव्हाण, संचालक डॉ. सुरेंद्र सिंग राठोड, उपसंचालक प्रा. डॉ. उदय दबडे, तसेच डॉ. शिवाजी तायडे, डॉ. अनिता तावडे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आभार मानत यशाचे श्रेय त्यांना दिले.
श्री. अनिल पोवार यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधनात्मक कामगिरीबद्दल कोल्हापूरसह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.











