यादनवाडी, ता. चिक्कोडी येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेच्या मैदानाची सध्या दुरवस्था झाली असून मैदानावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना मैदानावर खेळताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळाचे मैदान अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, मैदानाची योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होत नाही. मैदानावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने घसरून पडण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुरक्षित व योग्य मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेचे मैदान हे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक उपक्रमांसोबतच विविध क्रीडा उपक्रमांसाठीही महत्त्वाचे आहे.
त्यामुळे मैदानाची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत व संपूर्ण मैदान सपाट करावे, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पद्मश्री रुगे मॅडम यांनी मैदानाच्या समस्येबाबत आश्वासन देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.
त्यामुळे त्यांच्या आश्वासनानंतर मैदानाची समस्या लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळेच्या मैदानाची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवून मैदान खेळण्यासाठी योग्य करून द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.











