
संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी : ‘ ज्या शाळेने शिक्षणाची पहिली पायरी दाखवली,तिचे ऋण फेडण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता,’ या भावनेतून कडलगे खुर्द येथील प्रथमेश राजेंद्रकुमार पाटील यांनी आपल्या नोकरीतील पहिला पगार सामाजिक उपक्रमासाठी खर्च करत मातृशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी मराठी विद्यामंदिर, कडलगे खुर्द येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला. प्रथमेश पाटील यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी गडहिंग्लज येथे पुढील शिक्षण पूर्ण करून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे उच्च शिक्षण घेतले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३ जुलै २०२६ रोजी एका बहुराष्ट्रीय अमेरिकन औषधनिर्मिती कंपनीत ते रुजू झाले.
नोकरीचा पहिला पगार मिळाल्यानंतर स्वतःसाठी खर्च करण्याऐवजी आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते चौथीतील सुमारे ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच आर्थिक अडचणींमुळे आवश्यक शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, हा या उपक्रमामागील उद्देश होता.बालपणीचे ऋणही केले अदा आपल्या बालपणीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकेप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रथमेश पाटील यांनी साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला. पहिल्या पगारातून मातृशाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेला हा उपक्रम आणि बालपणी मार्गदर्शन करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा केलेला सन्मान यामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे.
प्रथमेश पाटील यांच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.











