Edition

‘धडपड’ सिनेमाच्या चित्रीकरणाला १२ ऑगस्टपासून गोमेवाडीत सुरुवात, बोधी सिनेमा प्रस्तुत, अश्विनी समाधान ऐवळे निर्मिती; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आटपाडी, प्रतिनिधी :
बोधी सिनेमा प्रस्तुत आणि अश्विनी समाधान ऐवळे निर्मित, बालाजी वाघमोडे यांच्या कथेवर आधारित ‘धडपड’ या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे १२ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाची संघर्षमय वाटचाल, स्वप्ने आणि त्यासाठीची धडपड यांचे प्रभावी चित्रण या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

‘धडपड’ या सिनेमात चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. स्मिता तांबे, किशोर चौगुले, कुशल बद्रिके, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल, अश्विनी कासार, प्रभाकर मोरे आणि रोहित चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाभोवती या सिनेमाचे कथानक फिरते. कर्त्या पुरुषाच्या कर्मदरिद्रीपणामुळे स्वप्नांची होणारी राख, त्यातून कुटुंबावर येणारी संकटे आणि या परिस्थितीतही संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी धडपडणारी स्त्री यांचे भावनिक आणि वास्तववादी चित्रण या कथेत करण्यात आले आहे.

कुटुंबातील निराशावादी नवरा, कॉलेजला जाणारा स्वप्नाळू मुलगा आणि त्याची प्रेमकथा, तसेच खेळकर लहान मुलगी या व्यक्तिरेखांमधून ग्रामीण कुटुंबातील नातेसंबंध आणि संघर्ष उलगडत जातात. आपल्या स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिली नाही, तर ज्वारीच्या बाटकाप्रमाणे ती स्वप्नेही जळून राख होतात, हा आशय या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे.

कुटुंब आणि आपल्या रानासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या स्त्रीची संघर्षगाथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावातील राजकारण, महिला नेतृत्व, राजकीय कुरघोड्या आणि त्यातून सामान्य माणसाची होणारी पिळवणूक यावरही भाष्य करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुभवी तंत्रज्ञांची टीम कार्यरत आहे. क्रिएटिव्ह डायरेक्टर अनुप जगदाळे, दिग्दर्शक अभिषेक जावीर, कॅमेरामन वीरधवल पाटील, कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, वेशभूषा दिपाली देशमुख, नेपथ्य स्वाती थोरात आणि कार्यकारी निर्माता कल्पेश जगताप, संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे हे या चित्रपटासाठी काम पाहणार आहेत.

ग्रामीण मातीत रुजलेली कथा, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांची गुंतागुंत, राजकारणाचे वास्तव आणि स्वप्नांसाठीची जिद्द यामुळे ‘धडपड’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे होणाऱ्या चित्रीकरणामुळे परिसरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!