गांधीनगर/प्रतिनिधी : उदय साळुंखे
गांधीनगर (ता. करवीर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त पंचशील तरुण मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल हेगडे होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी, “शिक्षणाचा पाया भक्कम असल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास सरपंच संदीप पाटोळे, ग्रामसेवक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे, सामाजिक कार्यकर्ते अशोक चंदवाणी, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे, उपसरपंच प्रशांत कुलकर्णी, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल चौगुले, कार्यकर्ते राजू कांबळे व अर्जुन कांबळे यांच्यासह पंचशील तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.











