

शिराळा प्रतिनिधी – भाटशिरगांव (ता. शिराळा) येथे आज सकाळी एसटी आणि टॅंकरची धडक झाली. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले असून एसटी मधील प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. एसटीमधील शाळकरी मुले व प्रवाशी अचानक घडलेल्या घटनेमुळे भेदरलेले होते. प्रसंगावधान राखून प्रसाद देसाई, कृष्णात नांगरे, पुजा देसाई आणि ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती.
गेल्या महिनाभरात आवळ ओढा येथे ५ अपघात झाले असून, त्यामध्ये १ मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. आवळ ओढ्यावर आणि ओढ्यानजीकच्या कोपऱ्यावर सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणेबाबतचे निवेदन दि. २३ जुलै २०२६ रोजी युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे. यानुसार ओढ्यावरील लोखंडी संरक्षक रेलिंगची दुरुस्ती झाली आहे. मात्र एवढ्या उपाययोजना पुरेशा नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याबाबत भाटशिरगांव येथील युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी सातत्याने विविध स्तरावर पाठपुरावा करत आहेत.












