Edition

यादनवाडी येथे मासिक पालक-शिक्षक सभा उत्साहात; प्राथमिक कन्नड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांकडून विधायक सूचना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिकोडी तालुका प्रतिनिधी अमर माने,

यादनवाडी तालुका चिकोडी येथील शासकीय वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेत दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणारी पालक-शिक्षक सभा याही महिन्यात दि. २५ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे जेपीटी शिक्षक श्री. एन. पी. माळी यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून सभेच्या उद्देशाविषयी माहिती दिली.

यानंतर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पद्मश्री रुगे यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छता, शिस्त, शालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच पालकांनी शिक्षण प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावण्याची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पालकांनी मांडलेल्या सूचना व अपेक्षांचे त्यांनी स्वागत करत शाळेच्या प्रगतीसाठी त्यांची निश्चितच दखल घेतली जाईल, असे सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा विकास व व्यवस्थापन समिती (एसडीएमसी) चे अध्यक्ष श्री. काशिनाथ खोत होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, नियमितपणे शाळेशी संपर्क ठेवावा आणि शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी एसडीएमसी सदस्य श्री. दीपक सिंधे, श्री. संतोष माने तसेच पालक श्री. बाबासो माने, श्री. रवी शिंदे, सौ. साक्षी खोत, सौ. तनुजा नडविणमणी, सौ. शीतल माने आदी उपस्थित होते.

उपस्थित पालकांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विधायक सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षक व पालक यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त करत शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या सभेला अतिथी शिक्षिका सौ. कावेरी जाधव यांचीही विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सभेला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

सभेच्या शेवटी उपस्थित सर्व पालक, शिक्षक व मान्यवरांचे आभार मानण्यात आले आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!