Edition

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त अंकलीत विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिकोडी तालुका प्रतिनिधी अमर माने,

अंकली : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी अंकली येथे विविध लोकोपयोगी, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. कोरे यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराबद्दल भव्य नागरी सत्कारही होणार असल्याची माहिती वाढदिवस उत्सव समितीचे अध्यक्ष बी. आर. पाटील व कार्याध्यक्ष भरतेश बनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना, शिवशक्ती शुगर्स, हर्म डिस्टिलरी, डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द सहकारी, इनामदार शुगर्स व केएलई संस्थेच्या विविध संलग्न संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसाची सुरुवात वृक्षारोपणाने होणार असून, गेली १९ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात यंदा ६०० हून अधिक रक्तदाते सहभागी होणार आहेत.

सकाळी ११ वाजता शिवालय येथील ‘अनुभव मंटप’मध्ये डॉ. कोरे यांचा नागरी सत्कार होईल. दुपारी श्रीमती शारदादेवी कोरे हायस्कूल मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील जंगी निकाली कुस्ती स्पर्धा होणार असून पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटकातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला ७० ते ८० हजार कुस्तीप्रेमी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

सायंकाळी प्रसिद्ध पार्श्वगायक राजेश कृष्णन यांच्या संगीत मैफिलीने कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार शशिकला जोल्ले, गणेश हुक्केरी, अमित कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस यावेळी चिदानंद कोरे साखर कारखान्याचे चेअरमन श्री.मल्लिकार्जुन कोरे, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब काटे, संचालक अजित देसाई, महावीर मिरजे, चेतन पाटील, महावीर कात्राळे, मल्लप्पा म्हैसाळे, परसगौडा पाटील, भीमगौडा पाटील, अण्णासो इंगळे, कार्यकारी संचालक बी.आर.एम.बी.आर.एन.बी.आर. पाटील, संजय कुडचे, नागेश मजुकर, युवराज पाटील, सिद्धगोंडा मगदूम आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!