
सांगली प्रतिनिधी – शिराळा तालुक्यातील मांगले गावात सुमारे ३०० वर्षांपासून सुरू असलेला पारंपरिक बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला. या अनोख्या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच वाळवा, शिराळा तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
सकाळी सहा वाजल्यापासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना अंघोळ घालून आकर्षक सजावट करण्यास सुरुवात केली. रंगीबेरंगी झुली, फुलांच्या माळा आणि पारंपरिक अलंकारांनी सजलेले बैल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गावातील तरुणांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परंपरा जपण्याचा संदेश दिला.
दुपारी चार वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजविलेल्या बैलांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करत या पारंपरिक सोहळ्याचा आनंद लुटला.
शेतकऱ्यांचा सखा मानल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा बेंदूर सण मांगले गावाची सांस्कृतिक ओळख बनला असून, तीन शतकांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.










