Edition

देवगिरी बँकेला ४१ कोटींचा नफा; राजस्थानात शाखाविस्ताराची घोषणा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

देवगिरी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपास मंजुरी.

छ. संभाजी नगर : देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगरची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत बँकेचे अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकेच्या कामगिरीचा सविस्तर आढावा सादर केला.यावेळी बँकेने ४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविल्याची माहिती देताना, बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेला प्राप्त झालेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा आणि सुरू करण्यात आलेली इंटरनेट बँकिंग सेवा हे बँकेच्या प्रगतीतील महत्त्वाचे टप्पे असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे सभासद व कर्मचारी यांच्या दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.सभेमध्ये संचालक मंडळाने मांडलेल्या विविध ठरावांना सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली. त्यामध्ये सर्व सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लाभांशाची रक्कम सभासदांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये तसेच सभागृह नेते गोविंद केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रा.स्व संघाचे देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, प्रांत कार्यवाह धनंजय धामणे, प्रांत सह कार्यवाह डॉ. रमेश जाधव, जेष्ठ सभासद शरद भोगले, माजी संचालक हिम्मतराव गवळी, रघुवीर ओक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी अध्यक्ष किशोर शितोळे यांनी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये व्यवसायवाढ, आधुनिक बँकिंग सुविधा, डिजिटल सेवा आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राजस्थानातील सीकर जिल्ह्यात देवगिरी बँकेची नवीन शाखा सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आगामी काळात महाराष्ट्रालगतच्या इतर राज्यांमध्येही शाखाविस्तार करण्याचा बँकेचा मानस आहे.
सभेमध्ये सभासदांनी विविध विषयांवर सूचना व प्रश्न उपस्थित केले. त्यास बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव शेरकर, अशोक पाटील, प्रशांत देशपांडे आणि ॲड. मुकेश गोयंनका यांनी सविस्तर व समाधानकारक उत्तरे दिली. सभासदांनीही बँकेच्या विकासासाठी विविध विधायक सूचना मांडल्या.या सभेस बँकेचे उपाध्यक्ष उमेश दाशरथी, संचालक राजेश जैन, सजनराव मते, जयश्री किवळेकर, प्रशांत देशपांडे, नागनाथ काजळे, ॲड. सागर विद्वन्स, प्रा. डॉ. क्षमादेवी खोब्रागडे, डॉ. प्रज्ञा तल्हार, सुरेश जगाडे, व्यवस्थापन मंडळ सदस्य सरदारसिंग बैनाडे, यांच्यासह बँकेचे आजी-माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी व सन्माननीय सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी सूत्रसंचालन केले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यवृत्ताताचे वाचन केले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेंद्र कोयाळकर यांनी आभार मानले.
किशोर शितोळे म्हणाले…
“देवगिरी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून सभासदांचा विश्वास जपणारी लोकाभिमुख बँक आहे. ४१ कोटी रुपयांचा नफा, शेड्युल्ड बँकेचा दर्जा, इंटरनेट बँकिंग सेवा आणि आता राजस्थानातील शाखाविस्तार ही बँकेच्या प्रगतीची नवी पर्वे आहेत. सभासदांचा विश्वास आणि कर्मचार्‍यांचा समर्पित कार्यामुळे देवगिरी बँक राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!