Edition

रिसोड बीएमसी अंतर्गत गोवर्धन येथे डीएमटी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील बीएमसी अंतर्गत एमपीपी गोवर्धन येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला डीएमटी (DMT) प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार, 23 जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. गणेश पवार (वाशीम) उपस्थित होते. यावेळी इंदुजा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वशीम, ॲक्सिस बँक रिसोड शाखेचे व्यवस्थापक श्री. महाले, ॲक्सिस बँकेचे अधिकारी श्री. अभिजित देशमुख, प्रज्वल कडू, डॉ. वानखडे, डॉ. पंकज गावंडे, सुपरवायझर कुलदीप ठाकरे तसेच बीएमसीचे विनोद अवचार, योगेश राठोड, यज्ञेश ढोले आणि राहुल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणादरम्यान दूध उत्पादकांना आधुनिक दुग्ध व्यवस्थापन, पशुसंवर्धनातील सुधारित तंत्रज्ञान, दूध उत्पादन वाढविण्याच्या प्रभावी पद्धती, दूधाच्या गुणवत्तेचे जतन, पशूंचे आरोग्य व्यवस्थापन तसेच शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय दुग्ध व्यवसायातील आर्थिक नियोजन, बँकिंग सुविधा, कर्जपुरवठा, विमा संरक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबतही माहिती देण्यात आली.
प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी विविध विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दूध उत्पादन वाढविणे, पशुधनाची उत्पादकता सुधारणे आणि दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत दुग्ध व्यवसाय अधिक लाभदायक, स्पर्धात्मक आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा डीएमटी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!