कोल्हापूर : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ मायामी एअरपोर्ट यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याने सुमारे ३४ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन व सुसज्ज कक्षाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महापौर रूपाराणी निकम आणि मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या अत्याधुनिक सुविधेमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि गरजू रुग्णांना अत्यल्प दरात दर्जेदार, अचूक व अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध होणार आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या तत्कालीन अध्यक्षा रोटेरियन पूजा गांधी, सचिव श्रुती मंत्री, खजिनदार प्रशांत मेहता, प्रकल्प प्रमुख डॉ. अभिजित वज्रमुष्टी आणि प्रसाद मंत्री यांच्या विशेष पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारला.
महापौर निकम आणि आयुक्त डॉ. भारूड यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. भविष्यातही महानगरपालिका व रोटरी क्लबच्या माध्यमातून लोकहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी प्रांतपाल शरद पै, अरुण भंडारे व मशीन पुरवठादारांचा सत्कार करण्यात आला. रोटरी पदाधिकारी, मनपा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











