डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि. १८ जुलै श्रीराम प्रतिष्ठान, सेलू संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, उत्कर्ष विद्यालय, प्रोस्पेरिअस पब्लिक स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, क्युरिअस स्कूल, फिन स्कूल आणि जिज्ञासा बालविहार येथील शिक्षकांसाठी शनिवार, दि. 18 जुलै 2026 रोजी एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ सर्व घटक संस्थांतील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व घटक संस्थांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.सकाळच्या सत्रात”Competency-Based Education (CBE) and Lesson Planning for Effective Teaching” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. संजय रोडगे (संस्थापक अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान), अनिल वेमुळे, अब्दुल बशीर, डॉ. बी. सोनवणे आणि डॉ. एम. रत्नपारखी यांनी शिक्षकांना कौशल्याधारित शिक्षण, प्रभावी पाठनियोजन, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन आणि आधुनिक अध्यापन पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात “NEP 2020 and NCF 2023 Implementation in Classroom” या विषयावर पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांची वर्गखोलीतील प्रभावी अंमलबजावणी, अनुभवाधारित शिक्षण, मूल्यमापन आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यावर चर्चा करण्यात आली.या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना आधुनिक, कौशल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापनाची दिशा मिळाली. प्रशिक्षणाबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.












