सांगली प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनोख्या रक्तदान आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 17 जुलैपासून कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे “खून लो, लेकिन खेती मत लो” या घोषणेसह रक्तदान आंदोलनाला सुरुवात होणार असून, हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती पलूस-कडेगाव-खानापूर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दिपक लाड यांनी दिली.
नेवरी येथे सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत आंदोलनाची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली. बैठकीला शेतकरी, युवक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
संघर्ष समितीच्या माहितीनुसार, रक्तदान करणाऱ्या प्रत्येक बाधित शेतकऱ्याचा व्हिडिओ तयार करून तो आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयाला पेनड्राइव्हद्वारे पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा त्याग आणि त्यांच्या भावना शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचाव्यात, हा या आंदोलनामागील उद्देश असल्याचे समितीने स्पष्ट केले.
गेल्या चार महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्गाविरोधात गावोगावी बैठका, शेतकरी मेळावे, जनजागृती मोहीम, पायी आत्मक्लेश यात्रा, अधिसूचना होळी, मोर्चे, ड्रोन मोजणीला विरोध तसेच न्यायालयीन लढा अशा विविध माध्यमांतून आंदोलन सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आगामी काळात हे आंदोलन आणखी व्यापक आणि तीव्र करण्याचा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला.
यावेळी बोलताना ॲड. दिपक लाड म्हणाले, “ही लढाई केवळ तीन तालुक्यांची नसून शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या हक्कांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले, तर आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही रक्तदान करत आहोत. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”
बैठकीला संघर्ष समितीचे पदाधिकारी, उद्योजक, महिला कार्यकर्त्या आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते. 17 जुलै रोजी नेवरी येथे होणाऱ्या या रक्तदान आंदोलनाकडे आता राज्यभरातील शेतकरी आणि सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.












