प्रतिनिधी | कोल्हापूर
कोल्हापूर शहरालगतच्या कळंबा परिसरातील एका तीनपानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सोमवारी धडक कारवाई करत आठ जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, नऊ मोबाईल हँडसेट आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹1.69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू असून, त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली होती. कळंबा गावातील हॉटेल निलेश डायनिंगच्या पाठीमागील बंदिस्त खोलीत पैशांवर तीनपानी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सोमवारी (दि. १३) सापळा रचून छापा टाकला.
छाप्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने तत्परतेने कारवाई करत सर्वांना जागीच ताब्यात घेतले.
या कारवाईत अमोल धोंडीराम साळोखे, विनायक विलास शिंदे, मारुती आनंदा बराले, सुनील मारुती मांगले, कुमार केरबा पांडुरंग जाधव, प्रकाश मारुती चव्हाण, महादेव आनंदा तिवले आणि पांडुरंग शांताराम खानविलकर हे तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींकडून ₹32,600 रोख रक्कम, ९ मोबाईल हँडसेट तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹1.69 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विनायक चौगुले, प्रविण पाटील, विशाल चौगुले आणि संदीप बेंद्रे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या धडक कारवाईनंतर कळंबा परिसरातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.











