
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसी (IRCTC) चे अत्याधुनिक नवीन संकेतस्थळ सुरू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ पासून ही नवी प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे. नव्या संकेतस्थळामुळे तिकीट आरक्षणाची प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि प्रवासी-केंद्रित होणार आहे.
नवीन प्रणालीमध्ये तिकिट बुकिंगची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असून, आता दर मिनिटाला १.५ लाखांहून अधिक तिकिटे बुक करता येणार आहेत. तसेच पीएनआर स्थिती आणि ट्रेन चौकशीची क्षमता ४० लाखांहून अधिक विनंत्या प्रति मिनिट इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः तत्काळ (Tatkal) आरक्षणावेळी होणारा ताण कमी होण्यास मदत होईल.
वेबसाईटचा इंटरफेस अधिक आकर्षक, स्वच्छ आणि वापरण्यास सोपा करण्यात आला आहे. अनावश्यक कॅप्चा, पॉप-अप जाहिराती आणि अडथळे दूर करण्यात आल्याने बुकिंग अधिक जलद होईल. प्रवाशांना पसंतीची सीट किंवा बर्थ निवडण्याची सुविधा, विविध तारखांवरील भाड्याची तुलना करण्यासाठी ‘फेअर कॅलेंडर’ आणि मराठीसह बहुभाषिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठीच्या रेल्वे सवलती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. ही नवीन आरक्षण प्रणाली जुन्या प्रणालीपेक्षा दहापट अधिक ट्रॅफिक हाताळण्यास सक्षम असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. याच सुविधांचा लाभ ‘RailOne’ मोबाईल ॲपवरही मिळणार असल्याने देशभरातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक सुलभ आरक्षणाचा अनुभव मिळणार आहे.











