
कोल्हापूर, प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील वाशी गावाजवळील सनराईज लॉजमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला. व्हॉट्सअॅपवर खासगी ‘फ्रेंड सर्कल’ ग्रुप तयार करून महिलांचे फोटो पाठवत ग्राहकांना आमिष दाखविले जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला आणि धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून रोख रक्कम, मोबाईल फोन, निरोधांची पाकिटे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध देहव्यापाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाशी गावाच्या हद्दीतील सनराईज लॉजमध्ये पुणे व मुंबई येथून महिलांना आणून कथितरित्या देहव्यापार चालविला जात असल्याची माहिती समोर आली.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक पाठविला. व्यवहाराची खात्री झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने लॉजवर छापा टाकला. कारवाईदरम्यान सागर प्रभाकर कांबळे (रा. मिनचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) हे आढळून आले. प्राथमिक चौकशीत लॉजचालक शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याच्यासह त्याचे सहकारी सुहास निचीते आणि विक्रम दिनकर कांबळे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय असून छाप्यावेळी हे तिघे घटनास्थळी आढळले नाहीत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून सदस्यांना महिलांचे फोटो पाठवत ग्राहक मिळविण्याची व्यवस्था केली होती. ग्राहकांकडून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारले जात असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. तसेच ६,९०० रुपये रोख, चार मोबाईल फोन, निरोधांची पाकिटे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई आणि त्यांच्या पथकाने केली.











