Edition

चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत उपयुक्त साठा ३२ टक्क्यांनी कमी…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत धरणात १.६४ टीएमसी पाण्याची भर पडली असून आज गुरुवार सकाळी ६ वाजेपर्यंत धरण ५६.७४ टक्के भरले आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार धरणाची पाणीपातळी ६०९.७० मीटर झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा १९.५२ टीएमसी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १२.६४ टीएमसी (४५.९२ टक्के) इतका आहे. धरणात सध्या १८,९४५ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत पाथरपुंज येथे १४३ मिमी तर चांदोली धरण परिसरात ८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात पाथरपुंज येथे आतापर्यंत २,०९२ मिमी, तर चांदोली धरण परिसरात ८९५ मिमी पाऊस झाला आहे.
मात्र, पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत उपयुक्त साठा कमी असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात २१.४६ टीएमसी (७८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा तो १२.६४ टीएमसी (४५.९२ टक्के) असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३२ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत धरणातील पाणीसाठ्यात ८.३२ टीएमसीची वाढ झाली आहे.
सध्या धरणातून स्पिलवे, कालवा किंवा नदीपात्रात कोणताही विसर्ग सुरू नसल्याने वारणा नदीची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सततच्या पावसामुळे वारणा खोऱ्यातील ऊस व भात पिकांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुसरीकडे, नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!