सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून उखळू, उदगीर, गुढे-पाचगणी, मणदूर आणि सोनवडे परिसरातील धबधबे दिमाखात प्रवाहित झाले आहेत. सुमारे ३०० फूट उंचीवरून फेसाळत कोसळणारे हे धबधबे पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने चांदोलीत दाखल होत आहेत.
दाट जंगल, धुक्याने वेढलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे आणि निसर्गाचा मोहक साज यामुळे चांदोली परिसराने पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. विशेषतः उखळू आणि गुढे-पाचगणी येथील धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहेत. पर्यटकांकडून या ठिकाणी छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरणालाही मोठी पसंती मिळत आहे.
मात्र, या धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर जंगलातून पायपीट करावी लागते. पावसाळ्यात पायवाटा निसरड्या होतात. त्याचबरोबर जंगलात मोठ्या प्रमाणावर जळूंचा त्रास होत असल्याने आणि दाट जंगलामुळे भरकटण्याचा धोका असल्याने स्थानिक मार्गदर्शकाशिवाय या भागात जाणे धोकादायक ठरू शकते.
चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या या परिसरात पावसाळी पर्यटनाची मोठी क्षमता आहे. सुरक्षित ट्रेकिंग मार्ग, दिशादर्शक फलक, पार्किंग, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास उखळू धबधबा व परिसर राज्यातील प्रमुख पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकतो, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींकडून होत आहे.
पर्यटकांसाठी सूचना : जंगलात जळू अंगाला चिकटल्यास ती जबरदस्तीने ओढून काढू नये. त्यावर मीठ किंवा तंबाखू टाकल्यास जळू स्वतःहून गळून पडते. त्यामुळे जंगलभ्रमंती करताना मीठ किंवा तंबाखू सोबत ठेवावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक मार्गदर्शकाच्या सहकार्यानेच धबधब्यांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.











