Edition

शहापूरमध्ये सुगंधित तंबाखू निर्मिती कारखान्यावर धाड; २०.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शहापूर (प्रतिनिधी) : मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने सुगंधित तंबाखूवरील बंदीबाबत काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या सुगंधित तंबाखूची निर्मिती सुरू असलेल्या कारखान्यावर शहापूर पोलिसांनी धाड टाकून तब्बल २० लाख २२ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस हवालदार उदय पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.५० या कालावधीत खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक ९३ मधील विनायक आनंद मुठाणे यांच्या मालकीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान सुगंधित तंबाखू, कच्ची तंबाखू, मेंथॉल क्रिस्टल्स, मसाला पावडर, लिक्विड पॅराफिन, लिक्विड ग्लिसरीन, विविध फ्लेवरिंग लिक्विड, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मिक्सर, स्टील भांडी, हँड हेल्ड इंकजेट प्रिंटर, कंटिन्युअस बँड सीलर मशीन तसेच महिंद्रा जितो (एमएच-१२-टीव्ही-९५१३) हे मालवाहू वाहन असा एकूण २०,२२,६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विनायक आनंद मुठाणे (वय ३७, रा. आर. के. नगर, शहापूर), पुनराम सोमलाल नाईक (वय ३६), अविनाश राजेंद्र कोळेकर (वय ३८, रा. इचलकरंजी), गोपाल राम अर्जुराम वाहन (वय २१) आणि मुळाराम बियाराम नाईक (वय २१) यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी काही आरोपी हे मूळचे राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, सहायक फौजदार अविनाश मुंगसे, पोहेकॉ उदय पाटील तसेच शहापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर सुगंधित तंबाखू उत्पादन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!